(मतीन शेख)
बुलढाणा: जळगाव जामोद नगरपरिषदेचे नवनियुक्त नगरसेवक व समाजवादी पक्षचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांचा मुंबई येथील पक्ष मुख्यालयात उत्साहात सत्कार करण्यात आला. अबू आसिम आझमी यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात पक्षाच्या आगामी रणनीतीवर विशेष चर्चा रंगली. नगरपरिषद पातळीवरील यश हे केवळ स्थानिक विजय नसून जिल्ह्यात संघटन अधिक बळकट करण्याची संधी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. बूथस्तरावर कार्यकर्त्यांची ताकद वाढवणे, नव्या पदाधिकाऱ्यांना संधी देणे आणि जनसंपर्क मोहिमा राबविणे यावर भर देण्यात आला. आमदार अबू आसिम आझमी यांनी आपल्या मार्गदर्शनात बुलढाणा जिल्ह्यात पक्षाची पाळेमुळे अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. सर्वसामान्यांच्या समस्या सोडविणे आणि स्थानिक विकासकामांना प्राधान्य देणे हीच पक्षविस्ताराची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला प्रदेश महासचिव प्रवेश सिद्दिकी, प्रदेश सचिव लियाकत खान, गुड्डू भाई तसेच मुंबई व बुलढाणा येथील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सत्कारानंतर सय्यद नफीस यांनी जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहण्याबरोबरच, जिल्हाभर समाजवादी पक्षाची विचारधारा पोहोचवण्याचा आपला निर्धार त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.