(मतीन शेख)
बुलढाणा : जिल्ह्यातील तामगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आचारसंहिता दरम्यान आज दि.४ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखाने केलेल्या धाडीत दोन देशी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे असा एकूण ८४ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धडाकेबाज कारवाईने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा अमोल गायकवाड आणि अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. वरवट बकाल परिसरात संशयिताच्या हालचालींबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीसांनी सापळा रचून पवन वासुदेव कोकाटे वय ३४ वर्षे रा.नांदेड यास ताब्यात घेतले.
त्याच्याकडून दोन देशी बनावटीचे कट्टे आणि चार जिवंत काडतुसे मिळून आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध आर्म्स ॲक्ट कलम ३,२५ सह भा.दं.सं. कलम १२३, १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात हेकॉ. एजाज खान, पोकॉ. अमोल शेजोळे, पोकॉ. अजीस परसुवाले आणि डीपीसी शिवानंद हेलगे यांचा समावेश होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तामगाव परिसरात बेकायदेशीर शस्त्रसाठ्याचे गांभीर्य स्पष्ट झाले असून, पोलीसांकडून पुढील तपास सुरू आहे.