(मतीन शेख)
राज्यसभेत मंगळवारी संविधानावरील चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या वक्तव्यावर विरोधकांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या वारशावर बोलतांना अमित शहा म्हणाले, ‘ही आता फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर… एवढं नाव जर देवाचं घेतलं असतं तर तुम्हाला सात जन्मांसाठी स्वर्ग प्राप्त झाला असता.” अमित शहा यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस पक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. राजकीय वर्तुळातून अमित शहांवर जोरदार टीका होत असून हा बाबासाहेबांचा अपमान असल्याचे सांगत शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एक्स या समाजमाध्यमावर एका पोस्टद्वारे गृहमंत्री अमित शहांच्या या वक्तव्यावर हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, “गृहमंत्री अमित शहा यांनी आज सभागृहात बाबासाहेबांचा अपमान केला आहे. असं बोलून त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की भाजप आणि राष्ट्रीय सेवा संघ तिरंग्याच्या विरोधात होते. त्यांच्या पूर्वजांनी अशोक चक्राला देखील विरोध केलेला होता. संघ परिवारातील लोकांना पहिल्या दिवसापासून भारतीय संविधाना ऐवजी मनुस्मृती लागू करायची होती.” असंही पुढं ते म्हणाले.
आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप भाजपनं फेटाळला
या प्रकरणाच्या विरोधात अनेक काँग्रेस नेत्यांच्या समाज माध्यमांवर पोस्ट आल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. शिवाय काँग्रेसनं अमित शहांच्या भाषणाचा अर्धवट व्हिडीओ पोस्ट केल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस ज्या भागावर आक्षेप घेत आहे तो भाग अपूर्ण असून लोकांनी संपूर्ण व्हिडिओ ऐकावा, असंही म्हटलं आहे. अमित शहा यांच्या त्या भाषणाचा पूर्ण व्हिडीओ पोस्ट करत भारतीय जनता पक्षानं लिहिलं आहे की, “अमित शहा यांनी काँग्रेसला आरसा दाखवला आहे.