बुलडाणा : शेतकऱ्यांच्या हिताकरिता रविवार, १६ फेब्रुवारी रोजी प्रमिलाताई ओक सभागृह अकोला, येथे शेतकरी विकास मंच महाराष्ट्राच्या वतीने शेतकरी समाधान मेळाव्याचे आयोजन केले आहे. शेतकरी विकास मंच महाराष्ट्रा च्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्या मध्ये सोयाबीन, कापूस, तूर उत्पादकांना २०२४-२५ या वर्षाकरिता एकरी दहा हजार रुपये तत्काळ अनुदान देण्यात यावे, सन २०२४-२५ वर्षासाठी पीक विमा व नैसर्गिक आपत्ती मदत तत्काळ देण्यात यावी, शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, शेतीला दिवसा वीज द्यावी, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ९० टक्के अनुदानावर तार कुंपण देण्यात यावे, शेती व्यवस्थापन सोयीचे व्हावे याकरिता युद्ध पातळीवर पाणंद रस्त्याची निर्मिती करावी, शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांच्या शिक्षण आणि मुलींच्या लग्नासाठी दीर्घ मुदतीत वित्त पुरवठा करण्यात यावा, पिकाला हमीभाव मिळण्याकरिता एमएसपी गॅरंटी कायदा करावा, अशा प्रकारच्या शेतकरी हिताचे विषयासंदर्भात या कार्यक्रमात संवाद साधल्या जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष मोहम्मद सलीम इंजिनिअर हे राहणार आहेत. या मेळाव्याला संयुक्त किसान मोर्चाचे डॉ. सुनील, शेतकरी विकास मंच इलियास खान, फलाडी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, देशोन्नतीचे मुख्य संपादक तथा किसान ब्रिगेडचे संस्थापक प्रकाश पोहरे, शेतकरी विकास मंच जमीर कादरी अब्दुल, गजानन अमदाबादकर, शेतकरी संघटनेचे लक्ष्मीकांत कोटकर तथा शेतकरी विकास मंच अध्यक्ष हुसेन खान यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन लियाकत अली खान चिखली, अमान इमानदार हिवरखेड, भास्कर डोंगरे हातरून, अब्दुल मन्नार घाट लाडकी, मोहम्मद अफजल पिंपळगाव राजा, अब्दुल्लाह खान अर्धापूर, हुसेन खान बार्शिटाकळी यांनी केले आहे.