(मतीन शेख)
बुलढाणा : जळगाव जामोद बस आगार परिसरात मागील काही महिन्यांपासून पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. संपूर्ण परिसरात अंधार पसरत असल्याने चोरी, महिलांची सुरक्षा आणि गैरप्रकारांची शक्यता वाढली आहे. विशेषतः महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. अंधाराचा फायदा घेत काही मनचले प्रवाशांना त्रास देत असल्याचीही तक्रार समोर येत आहे. बस आगार परिसरात सुरक्षारक्षक तैनात नसल्याने सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी प्रकर्षाने जाणवत आहेत. आगारातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे गुन्हेगारी घटना घडल्यास ठोस पुरावे मिळण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्याशिवाय, आगारातून निघणाऱ्या अनेक एसटी बस गावांच्या फलकाविना धावत असल्याने प्रवाशांना आपली बस कोणत्या दिशेने जाणार आहे हे ओळखणे कठीण होत आहे. चौकशी कक्षामध्ये लाऊडस्पीकरद्वारे कोणतीही अनाउन्समेंट न केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान, आगारातील सुलभ शौचालयांची दुरवस्था चिंताजनक आहे. शौचालयात घाणीचा साठा असून नळांना पाणी उपलब्ध नाही. हात धुण्यासाठी असलेली बेसिनही नादुरुस्त आहेत. बस आगारातील वाहनांची दुरुस्ती आणि देखभाल वेळीच व दर्जेदार न केल्याने येथील अनेक बसेस वारंवार बंद पडत असल्याचे प्रवाशांकडून सांगितले जात आहे. वेळेवर बस सुटत नसल्याने दूरच्या मार्गांवरील बसमध्ये मोठी गर्दी होत आहे, तर सुनगाव, जामोद, आसलगाव, खांडवी या मार्गांवर बस धावत नसल्याची परिस्थिती कायम आहे. आगार व्यवस्थापक पवन टाले यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे आगार तोट्यात चालत असल्याची चर्चा प्रवासी वर्गात सुरु आहे. त्यातच काही वाहकांकडून प्रवाशांशी गैरवर्तन केल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. जळगाव जामोद बस आगारातील या गंभीर समस्यांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन योग्य तोडगा काढावा, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रवासी वर्गाने या सर्व समस्यांवर त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.