(मतीन शेख)
बुलढाणा: पळशी पुरा संग्रामपूर येथील रहिवासी शेख अनीस शेख गफ्फार वय ४० हे वडगाव वान परिसरात नायलॉन मांज्यामुळे गंभीर जखमी झाले. मंगळवारी सायंकाळी सुमारे ६ वाजता ही घटना घडली. मिळालेल्या माहिती नुसार, शेख अनीस हे दानापूर येथे क्रिकेट खेळण्यासाठी गेले असताना वडगाव वान परिसरात अचानक नायलॉन मांज्याने त्यांच्या गळ्याला चिरा बसला. घटनेनंतर त्यांना तातडीने वरवट बकाल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे रेफर करण्यात आले असून सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे नायलॉन मांज्यामुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.