(मतीन शेख)
अकोला : जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या मतदारसंघांतील आमदारांना बिश्नोई टोळीकडून खंडणीसाठी धमक्या आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे तसेच अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना धमकीचे फोन आल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकोट येथील भाजप शहराध्यक्षांना तीन ते चार दिवसांपूर्वी एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला होता. “आमदार भारसाकळे यांच्याकडून दोन कोटी रुपये वसूल करून द्यावेत, अन्यथा तुला आणि आमदाराला पाहून घेऊ,” अशी धमकी देण्यात आली. ही धमकी बिश्नोई टोळीतील शुभम लोणकर याने दिल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर अकोटमधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून संबंधित शहराध्यक्षांनाही पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. दरम्यान, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे ३ वाजता अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना देखील धमकीचा फोन आल्याचे समोर आले आहे. बिश्नोई टोळीतील हस्तक शुभम लोणकर याने भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत “दोन दिवसांत १० कोटी रुपये दे, अन्यथा तुझा गेम करू,” अशी धमकी दिल्याचे आमदारांनी सांगितले. हा कॉल कॅलिफोर्नियाहून आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी आमदार साजिद खान पठाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून अधिकृत तक्रार दाखल केली असून संबंधित प्रकरणात गुन्हा नोंद (एफआयआर) करण्यात आल्याची माहिती आहे. त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून चार सशस्त्र पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सलग दोन आमदारांना धमक्या आल्यामुळे अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. संबंधित प्रकरणांचा तपास सुरू असून धमकीमागील सूत्रधारांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे.